राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर नाराजी असल्याने राजीनामा दिल्याची चर्चा!
जामनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अंतर्गत अस्वस्थता उफाळून आली आहे. सामाजिक न्याय विभागाचे जामनेर तालुकाध्यक्ष अरविंद शांताराम तायडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. नगरपालिका निवडणुकीच्या संपूर्ण काळात पक्षाकडून कोणतीही मदत, पाठबळ किंवा समन्वय मिळाला नसल्याने ते तीव्र नाराज होते. अखेर या नाराजीचा स्फोट होत आज त्यांनी थेट राजीनामा दिला.

राजीनामा पत्रात तायडे यांनी वैयक्तिक कारणे नमूद केली असली, तरी निवडणूक काळात झालेली उपेक्षा, डावलण्याची भावना आणि पक्षातील अंतर्गत गटबाजी हीच खरी कारणे असल्याची चर्चा आहे. निवडणुकीत कार्यकर्ते झटत असताना वरिष्ठ पातळीवरून दुर्लक्ष झाल्याने अनेक पदाधिकारी अस्वस्थ असल्याचे यानिमित्ताने पुन्हा समोर आले आहे.
दरम्यान, अरविंद तायडे हे लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्यामागची नेमकी कारणे जाहीरपणे मांडणार असल्याची माहिती आहे. या पत्रकार परिषदेत पक्षातील अंतर्गत वास्तव, निवडणुकीतील अनुभव आणि नाराजीची सविस्तर कारणे उघड होण्याची शक्यता आहे. निवडणूक काळातच पदाधिकाऱ्याचा राजीनामा हा पक्षासाठी धक्का मानला जात असून, याचे राजकीय पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.
+ There are no comments
Add yours