चाळीसगावचा डिजिटल तक्रार निवारण प्रयोग जामनेरमध्ये कधी? नागरिकांचा सवाल

चाळीसगावचा नाविन्यपूर्ण तक्रार निवारण उपक्रम जामनेरमध्ये राबवणार का?

जामनेर : चाळीसगाव शहरातील नागरिकांच्या रोजच्या समस्या जलद व पारदर्शक पद्धतीने सोडवण्यासाठी चाळीसगाव नगरपरिषदेने एक नाविन्यपूर्ण मोबाईल अ‍ॅप सुरू केला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, घरबसल्या तक्रार नोंद, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन आदी नागरी समस्या थेट नगरपरिषदेकडे नोंदवता येणार आहेत.

या अ‍ॅपमुळे नागरिकांना नगरपरिषदेच्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. नागरिक आपल्या मोबाईलवरून तक्रार नोंदवताच ती संबंधित विभागाकडे तत्काळ वर्ग केली जाणार असून २४ तासांत कार्यवाही अपेक्षित आहे. तक्रारीची सद्यस्थिती ‘रिअल टाईम ट्रॅकिंग’द्वारे पाहता येणार असल्याने प्रशासनात पारदर्शकता येणार आहे. तक्रार निकाली निघाल्यानंतर मोबाईलवर सूचना मिळणार असून फोटो अपलोड करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.

या उपक्रमाचे लोकार्पण नगराध्यक्ष प्रतिभा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी सौरभ जोशी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान, कागदविरहित व उत्तरदायी व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, चाळीसगावमध्ये यशस्वी ठरत असलेला हा डिजिटल तक्रार निवारण उपक्रम जामनेर शहरातही राबविला जाणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. जामनेरमध्येही रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व स्ट्रीट लाईटसारख्या समस्यांबाबत नागरिकांना तात्काळ प्रतिसाद देणारी व्यवस्था उभारण्याची गरज असून, चाळीसगावचा हा मॉडेल उपक्रम जामनेरसाठी मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours