जळगाव | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) युवक काँग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा विश्वजित मनोहर पाटील यांनी दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विश्वजित पाटील यांनी हा राजीनामा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडे सादर केला आहे.

राजीनाम्यात त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह युवक जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. पक्षाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवून सन्मान दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले असून, पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. आपल्या कार्यकाळात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने माफी मागत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, विश्वजित पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पाचोरा मतदारसंघाचे शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांची भेट घेतल्याचे समोर आले होते. या भेटीनंतर ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले असून, लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विश्वजित पाटील यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत अद्याप अधिकृत घोषणा नसली तरी त्यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस युवक संघटनेला जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात जळगाव जिल्ह्यातील राजकारणात नवे समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
+ There are no comments
Add yours