शेंगोळा गावात सांडपाण्याचा कहर; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, ग्रामपंचायत निष्क्रिय

जामनेर तालुक्यातील शेंगोळा गावात सध्या अस्वच्छतेचा कळस गाठला असून, संपूर्ण गाव सांडपाण्याच्या विळख्यात अडकले आहे. रस्त्यांवरून वाहणाऱ्या गटारीच्या पाण्यामुळे गावात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः त्रस्त झाले आहे. लहान मुले आजारांच्या विळख्यात सापडण्याची भीती वाढत असताना, ग्रामपंचायत मात्र गप्प बसल्याचे चित्र आहे.

गावातील धार्मिक स्थळांनाही या घाणीचा फटका बसला आहे. मुस्लिम समाजाच्या मशीद परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून, हनुमान मंदिराच्या आसपासही अस्वच्छतेचे भयावह दृश्य पाहायला मिळत आहे. धार्मिक स्थळांजवळील ही अवस्था प्रशासनाच्या बेफिकिरीचे दर्शन घडवते.

डेंग्यू, मलेरिया, पोटाचे विकार आणि त्वचारोग पसरण्याची शक्यता वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वारंवार तक्रारी करूनही स्वच्छतेबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. जामनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना ISO दर्जा मिळाल्याचा गाजावाजा होत असताना, शेंगोळा ग्रामपंचायतीचा हा कारभार त्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे.

ग्रामस्थांनी तात्काळ स्वच्छता मोहीम, गटारींची दुरुस्ती आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. पंचायत समिती प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours