जामनेरमध्ये ‘40 फुटी’ बॅनरबाजीचा सुळसुळाट! जयंती-महोत्सवाच्या नावाखाली होर्डिंग्जचे जंगल; प्रशासन मौन का?

जामनेर शहरात सध्या जयंती आणि महोत्सवांच्या नावाखाली भल्या मोठ्या बॅनरबाजीचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. मुख्य रस्त्यालगत 30 ते 40 फुटी होर्डिंग्ज उभारली जात असून चौकाचौकांत फलकांचे जंगल निर्माण झाले आहे. शहर सुशोभीकरणाच्या घोषणा एकीकडे, तर दुसरीकडे शहराचे विद्रूपीकरण— असा विरोधाभास नागरिकांना खटकत आहे.

अतिक्रमण विभाग गोरगरिबांवर तत्पर कारवाई करताना दिसतो; मात्र धनदांडग्यांच्या भव्य फलकांसमोर प्रशासन नतमस्तक झाले आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. नियमांचे पालन होते का? परवानग्या देताना निकष काय? नियमबाह्य फलकांवर कारवाई का नाही? हे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत.

सर्वात मोठा मुद्दा म्हणजे— एवढ्या प्रचंड आकाराच्या होर्डिंग्ज उभारण्यासाठी लागणारा पैसा येतो तरी कुठून? एका सामान्य नगरसेवकाकडे इतका निधी कसा उपलब्ध होतो? हा खर्च वैयक्तिक आहे की इतर मार्गाने उभारला जातो? स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये कुजबुज वाढली आहे.

पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधक यांची भूमिका काय? शहराच्या विद्रूपीकरणाशी त्यांना काही देणंघेणं आहे का, असा प्रश्नही विचारला जात आहे. जामनेर नगरपालिका प्रशासनाने परवानग्यांची माहिती सार्वजनिक करावी आणि नियमबाह्य फलकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शहराच्या सौंदर्यावर होर्डिंग्जचा मारा थांबणार कधी? आणि प्रशासन जागं होणार कधी? जामनेरकर आता उत्तरांची वाट पाहत आहेत.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours