जामनेरमध्ये दिवसाढवळ्या थरार! दोन भावांवर अज्ञात टोळक्याचा जीवघेणा हल्ला; शहरात गुंडागर्दी वाढल्याचा आरोप
जामनेर शहर पुन्हा एकदा हादरले आहे. आंबीहोळ येथील दोन सख्ख्या भावांवर अज्ञात तरुणांच्या टोळक्याने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी पुरा भागात घडली. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून ही मारहाण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हल्लेखोरांनी दोन्ही भावांना बेदम मारहाण केली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एका भावाला अधिक उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर दुसऱ्या भावावर जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, जामनेर शहरात दिवसाढवळ्या मारहाणीच्या घटना, चोरी आणि दहशत वाढत असल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गुंडागर्दीवर आळा बसवण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
+ There are no comments
Add yours