जामनेर पालिकेची पहिली मासिक सभा बंद दाराआड; पत्रकारांना प्रवेशबंदी, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

जामनेर शहरातील नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली मासिक सभा आज पार पडली; मात्र सुरुवातीलाच ही बैठक वादाच्या भोवऱ्यात सापडली. सभेला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याने संपूर्ण बैठक बंद दाराआड झाली. त्यामुळे सभेत नेमकी कोणती चर्चा झाली, कोणते मुद्दे उपस्थित करण्यात आले आणि नागरिकांच्या कोणत्या समस्या मांडल्या गेल्या, याबाबत गूढ कायम राहिले आहे.

सर्वसाधारणपणे नगरपालिकेच्या मासिक सभेत शहर विकास, पायाभूत सुविधा, वार्डनिहाय समस्या यावर सविस्तर चर्चा होते आणि अधिकाऱ्यांकडून त्यावर उत्तरे दिली जातात. मात्र जामनेर पालिकेच्या पहिल्याच सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी घालण्यात आल्याने पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

नगरपालिकेचे सीईओ नितीन बागुल, नगराध्यक्ष साधना महाजन आणि उपनगराध्यक्ष प्रशांत भोंडे यांनी पत्रकारांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. पारदर्शक कारभाराचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी पहिल्याच बैठकीत माध्यमांना दूर ठेवल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, शरद पवार गटाच्या विरोधकांनीही या प्रकरणावर मौन बाळगल्याने त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या घडामोडींमुळे जामनेर पालिकेतील कारभार किती खुला आणि पारदर्शक राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours