जामनेरमध्ये आत्महत्येप्रकरणी पोलिसांवर गंभीर आरोप; सीआयडी चौकशीची मागणी

जामनेर (प्रतिनिधी):
जामनेर येथील कै. प्रशांत दिलीप वाघ यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

माहितीनुसार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी प्रशांत वाघ यांनी अजय प्रभाकर पोळ या व्यक्तीच्या कथित मानसिक व अश्लील छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले असता, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी न जाता प्रथम फोटो काढून मृतदेह रुग्णालयात पाठवण्याचे सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी वारंवार विनंती करूनही तब्बल 15 दिवस गुन्हा दाखल केला नसल्याने पोलिसांची भूमिका अमानवीय आणि निष्काळजी असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच, आरोपी अजय पोळ याला फरार होण्यासाठी पोलिसांकडून मदत झाल्याचाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

दरम्यान, पीडित कुटुंबीयांना प्रकरण आपसात मिटवण्याचा सल्ला दिल्याचा आरोपही पोलिसांवर करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे पोलिस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत असून समाजात संतापाची भावना निर्माण झाली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (CID) करण्यात यावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेडने केली आहे. तसेच, संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या मागण्यांसाठी लवकरच पोलिस महासंचालक कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही ब्रिगेडकडून जाहीर करण्यात आले आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours