विकासाच्या नावाखाली लूट? भागदरा ग्रामपंचायतीत लाखोंचा खेळ उघड!
कामं गायब, बिलं पास! भागदरा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर!
जामनेर तालुक्यातील भागदरा गावाच्या विकासाच्या नावाखाली निधीचा अपव्यय आणि कामांचा केवळ कागदोपत्री खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप भागदरा ग्रामपंचायतीवर होत असून, या प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावात सीसीटीव्ही बसविणे तसेच भूमिगत गटारी उभारणी यांसारखी महत्त्वाची कामे प्रत्यक्षात पूर्ण न होता केवळ कागदोपत्री दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर अनुसूचित जाती आणि नवबौद्ध योजनेअंतर्गत समाज मंदिरात फर्निचर आणि दुरुस्तीच्या नावावर पैसे लाटण्याचा आरोप आहे. त्याचबरोबर अंगणवाडी मध्ये बँचेस, खेळणी खरेदीच्या नावावर देखील अपहार केल्याचा आरोप आहे. संबंधित कामांची बिलं पास करून निधी काढण्यात आल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर संशयाची छाया अधिक गडद झाली आहे.

माहिती अधिकारातून समोर आलेल्या कागदपत्रांनुसार, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता पंचनामे केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामसेविका आणि सरपंच यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात येत आहेत.
गेल्या तीन वर्षांतील सर्व विकासकामांची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. मात्र, पंचायत समितीकडून अद्याप कोणतीही चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी मीनल करनवाल यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन स्वतंत्र चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. भागदरा ग्रामपंचायतीच्या कारभारातील या कथित गैरव्यवहारामुळे “पारदर्शक प्रशासन” ही संकल्पना केवळ नावापुरतीच राहिल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
दुसरीकडे भागदारा ग्रामपंचायतीवर पत्रकार सागर लव्हाळे आणि मोहन दुबे यांनी माहिती अधिकारातून झालेल्या विकास कामांची माहिती मागितली होती . मात्र ग्रामसेविका यांनी अपूर्ण आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याच देखील उघड झाले आहे.
+ There are no comments
Add yours