अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर कधी होणार कारवाई?
जामनेर:
जामनेर शहरात अनधिकृत फ्लेक्स लावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शहरातील अनेक चौक आणि परिसरात मोठमोठे अनधिकृत होर्डिंग त्याचबरोबर शुभेच्छांचे बॅनर लागलेले आहेत. फ्लेक्स लावणाऱ्या अनेकांनी नगरपालिकेकडून परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता या होर्डिंग्ज धारकावर नोटीस देऊन कारवाई करण्यात येणार का असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जामनेर शहरात अनेक हौशे नौशे जाहिरातदार खांबांवर , पथदिव्यांवर आणि त्याचबरोबर भर चौकात अनधिकृतपणे बॅनर लावून फुकटात जाहिराती करीत आहेत. आणि यातून नगरपालिकेचे लाखोंचे उत्पन्न बुडवत आहे. नगरपालिकेतील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जाहिरातदार सर्रास मिळेल तिथे आपली जाहिरात बाजी करत आहे. त्यामुळे याचे न नगरपालिका मुख्याधिकारी यांना घेणे-देणे आहे ना संबंधित अधिकाऱ्यांना असच दिसत आहे.
अनधिकृत जाहिरात फलक काढण्यासाठी नगरपालिकेची यंत्रणा काम तर करते, मात्र जाणून बुजून काही ठिकाणी दुर्लक्ष करत असल्याची टीका स्थानिक नागरिकांकडून होत आहे. त्याचबरोबर कारवाईनंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पुन्हा अनधिकृत पणे बॅनर लावले जातात. जामनेर शहरात सध्या शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या चौकात असंख्य अनधिकृत बॅनर लागले आहेत. त्यामुळे शहर विद्रुपीकरणात मात्र भर पडत आहे.
अधिकृत बॅनर बद्दल महापालिकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी अनेक जणांनी परवानगी न घेता बॅनर लावले असल्याची माहिती दिली आहे. अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई संदर्भात अधिकाऱ्यांशी बोलले असता नगरपालिकेचे उपमुख्यधिकारी रविकांत डांगे यांनी सांगितले की येणाऱ्या काही दिवसात नगरपालिकेकडून अशा अनधिकृत फ्लेक्स धारकांवर कारवाई करून दंड आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोणतीही जाहिरात फलक लावण्यापूर्वी नगरपालिकेकडून त्याची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असल्याची माहिती रविकांत डांगे यांनी दिली आहे.
होर्डींग पडल्याने झाला होता अपघात:
मुंबई येथील घाटकोपर भागात पेट्रोल पंपावर मे 2024 मध्ये अवकाळी पावसाच्या तडाख्यात मोठे होर्डिंग बॅनर कोसळले. यात १४ नागरिकांचा मृत्यू तर शेकडो नागरिक जखमी झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनधिकृत असलेल्या होर्डिंग बॅनरचा गंभीर प्रश्न उभा राहिला होता. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य शासनाने परिपत्रक काढून राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका भागातील अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याचे परिपत्रक काढले होते. त्यामुळे जामनेर नगरपालिका परिसरात अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांना नगरपालिका सूट देत आहे का असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. येणाऱ्या काळात अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर आतातरी कारवाई होणार का असा सवाल स्थानिकांकडून विचारला जात आहे.
+ There are no comments
Add yours