जामनेर
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे एका महिलेने दुसऱ्या महिलेला लाखो रुपयांचा चुना लावला आहे. या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून देखील आरोपी महिला सध्या फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2018 पूर्वी फतेपुर येथील राहणाऱ्या सुनीता प्रदीप चौधरी यांची सविता श्रावण राठोड यांच्याशी ओळख झाली. सुनिता चौधरी या सविता राठोड यांच्याच फत्तेपूर येथील घरात भाड्याने राहू लागल्या. दोन वर्षे भाड्याने राहिल्यानंतर दोघांची मैत्री घट्ट झाली. विश्वास संपादन केल्यानंतर आरोपी सुनिता चौधरी ने सविता राठोड यांच्याकडून मुलांच्या शिक्षणासाठी त्याचबरोबर पुण्यात कंपनी टाकण्यासाठी वेळोवेळी पैसे मागितले. गरजूला मदत करणे या शुद्ध हेतूने सविता राठोड यांनी सुनिता चौधरी यांना मदत केली. 2018 – 2019 मध्ये सुनीता चौधरी ने सविता राठोड यांच्याकडून वेळोवेळी सात तोडे सोन्याचे दागिने आणि 11लाख 50 हजार रुपयांची रक्कम उधारीवर घेतली. मैत्रीच्या नात्याने सविता यांनी आरोपी महिलेला मदत देखील केली. त्यानंतर काही दिवसांनी सविताने आपली रक्कम परत मागितली. मात्र सुनिता चौधरी यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. अखेर सविता राठोड यांनी पैसे मिळत नसल्याने सुनिता चौधरी यांच्या विरोधात फतेपुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर तडजोडीने सुनिता चौधरी यांनी सविता राठोड यांचे पैसे देण्याचे कबूल केले.
तक्रार दाखल झाल्यानंतर सुनीता चौधरी यांनी पाच लाखांचा चेक सविता राठोड यांना दिला होता. मात्र तो चेक बँकेत वाटविण्यासाठी टाकला असता बँकेत पुरेशी रक्कम नसल्याने आपली पुन्हा फसवणूक झाल्याचं सविता राठोड यांच्या लक्षात आले. त्यामुळे फिर्यादीने भारतीय चलनक्षम दस्ताऐवजांचा कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.
न्यायालयाकडून मिळालेल्या आदेशानंतर देखील फत्तेपूर पोलिसांनी आरोपी सुनीता प्रदीप चौधरी यांना फत्तेपूर पोलिसांनी ताब्यात घेतले नसल्याची माहिती फिर्यादी सविता श्रावण राठोड यांनी दिली आहे. आरोपी महिलेला पकडण्यासाठी दोन वेळा अटक वॉरंट निघाले आहे. मात्र आरोपी महिलेला पकडण्यासाठी फत्तेपुर पोलिसांकडे महिला पोलीस नसल्यामुळे आम्ही त्यांना अटक करू शकत नाही अशी माहिती फत्तेपूर पोलिसांनी फिर्यादी महिलेला दिली होती असं सविता राठोड यांनी सांगितले आहे. तरी आरोपी विरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कलम 138 प्रमाणे योग्य ती शिक्षा व दंड व्हावी अशी मागणी आहे सोबतच फिर्यादीचा खर्च व नुकसानी आरोपीकडून फिर्यादीस देण्यात यावी अशी मागणी सविता राठोड यांनी केली आहे.
+ There are no comments
Add yours