मतदान करा आणि मोफत डोळे तपासा !
२० आणि २१ नोव्हेंबरला ‘कांताई नेत्रालय’ चा उपक्रम
विधानसभा निवडणुकीत जळगाव शहर मतदार संघात बुधवारी, दि. २० नोव्हेंबरला मतदान करणाऱ्या मतदारांची मोफत डोळे तपासणी निमखेडी रोड व प्रतापनगर येथील कांताई नेत्रालयात केली जाणार आहे. या मोफत तपासणीची संधी दोन दिवस (२० आणि २१ नोव्हेंबर) अशी उपलब्ध आहे. ज्यांना नेत्रदोष वा इतर नेत्र विकाराची शक्यता वाटते अशा मतदारांनी त्यांच्या डाव्या हाताच्या बोटावर मतदानासाठी लावलेल्या शाईची खूण दाखवावी आणि मोफत नेत्र तपासणी करून घ्यावी असा हा उपक्रम आहे.
सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करणार्यांची संख्या वाढवावी या सामाजिक जबाबदारीतून या उपक्रमाचे आयोजन कांताई नेत्रालयातर्फे करण्यात आले आहे. जास्तीत जास्त जळगावकर मतदारांनी या उपक्रमात डोळे तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. कांताई नेत्रालयातर्फे यापूर्वी लोकसभा निवडणूक २०२४ च्यावेळी हाच उपक्रम राबविण्यात आला होता.
जळगाव शहर – जिल्ह्यातील नेत्र रूग्णांना उच्च दर्जाची नेत्र तपासणी, चष्मा संयोजन आणि शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने दि. १९ जानेवारी २०१६ ला कांताई नेत्रालयाची सुरवात करण्यात आली आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या कांताई नेत्रालयात आधुनिक उपकरणे आणि अनुभवी डॉक्टरांची पूर्णवेळ उपलब्धता आहे. गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत तीन लाखांहून अधिक रूग्णांची नेत्र तपासणी आणि पंचवीस हजाराहून अधिक रूग्णांवर यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना अतुल जैन या रेटिना सर्जन असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कांताई नेत्रालयाची यशस्वी वाटचाल सुरु आहे.
+ There are no comments
Add yours