“मासिक पाळी लाज नाही, अभिमान आहे” – मीनल करनवाल यांचा संदेश

जामनेर : सेवापंधरवड्याच्या उपक्रमांतर्गत “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या अभियानाचा उद्देश महिलांचे सशक्तीकरण व त्यांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंतीपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या अंतर्गत शेंदुर्णी येथे महिलांची आरोग्य तपासणी, तसेच किशोरवयीन मुलींना मासिक पाळी व वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मुलींना मान्यवरांच्या हस्ते सॅनिटरी पॅडचे वाटपही करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी जि.प. सदस्य संजयदादा गरुड यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, शेंदुर्णी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विवेक धांडे, तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

या वेळी आपल्या मनोगतात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल म्हणाल्या, “मासिक पाळी ही शाप नसून वरदान आहे. महिलांनी व मुलींनी या विषयावर मोकळेपणाने बोलले पाहिजे. मासिक पाळी लाज नाही, तर अभिमान आहे. प्रत्येक स्त्रीने आपल्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहितकुमार जोहरे यांनी मानले. सूत्रसंचालन पी.जे. पाटील यांनी केले.

महिला आरोग्य अधिकारी डॉ. पल्लवी राऊत यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळी व स्वच्छतेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विविध अधिकारी, डॉक्टर व सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours