निवेदनापुरते आंदोलन? – राष्ट्रवादी शरद पवार गटावर टीकेची झोड
जामनेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी तसेच शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मात्र, या निवेदनानंतर प्रत्यक्ष कृती न होता फक्त फोटोसेशन आणि प्रसिद्धीपुरतेच हे आंदोलन मर्यादित राहिल्याची चर्चा सुरू आहे.
जामनेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे कापूस, केळी, मका तसेच इतर अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या परिस्थितीत बँकांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी आणखी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर श्री. दिलीप बळीराम खोडपे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना सध्या प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने तात्काळ मदत जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे.”
दुसरीकडे स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत असून, “निवेदन देऊन सरकारवर आरोप करण्यापेक्षा प्रत्यक्ष मदतीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत,” अशी भावना व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही अशाच स्वरूपाची निवेदने देऊन राष्ट्रवादीने केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांचे खरे प्रश्न आणि त्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना राजकीय पक्ष केवळ निवेदनाच्या राजकारणात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. “निवेदन नव्हे, कृती हवी,” अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.
+ There are no comments
Add yours