जामनेर प्रतिनिधी
जामनेर : शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी बंदिस्त नाट्यगृहाची उभारणी ही काळाची गरज आहे, असा ठाम सूर ‘आनंदयात्री’ संस्थेतर्फे आयोजित विशेष परिसंवादात उमटला. ‘शहराचा सांस्कृतिक चेहरा : काल, आज आणि उद्या’ या विषयावर रंगभूमी दिनानिमित्त हा परिसंवाद घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक ‘नटराज पूजनाने’ करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरविंद चौधरी होते, तर प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. सुधीर साठे, पत्रकार मोहन सारस्वत, सेवानिवृत्त मुख्याध्यापक नाना लामखेडे, आणि तावडी बोली अभ्यासक डॉ. अशोक कोळी यांचा समावेश होता.
प्रा. साठे यांनी जामनेर शहरातील रंगभूमीचा समृद्ध इतिहास मांडत नाट्यचळवळीच्या पुनरुज्जीवनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता व्यक्त केली. नाना लामखेडे यांनी शाळा-महाविद्यालयांमधून नाट्यशिबिरे आयोजित करण्याची गरज मांडली, तर डॉ. अशोक कोळी यांनी बदलत्या काळात वाचन संस्कृती जोपासण्यावर भर दिला.
पत्रकार मोहन सारस्वत यांनी लोककला आणि चित्रकला संवर्धनासाठी नियमित सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. चौधरी यांनी जामनेरच्या सांस्कृतिक चळवळीला गती देण्यासाठी व्याख्यानमाला, प्रशिक्षण शिबिरे आणि स्थानिक निर्मिती उपक्रम राबविण्याची सूचना केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश राऊत यांनी केले, तर डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी आभार मानले. या प्रसंगी डॉ. अमोल सेठ, सुहास चौधरी, डॉ. राजेश सोनवणे, प्रा. नितीन पाटील आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी जिनियस इंटरनॅशनल स्कूलचे अनमोल सहकार्य लाभले.
+ There are no comments
Add yours