वार्ड १२ मध्ये निष्ठेची कसोटी; जगदीश सोनार यांची पत्नी स्वामिनी सोनार भाजप उमेदवारीसाठी इच्छूक

भाजपसाठी ही निवडणूक स्थानिक पातळीवर निष्ठा विरुद्ध प्रतिष्ठा

मोहन दुबे संपादक जामनेर

जामनेर नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच स्थानिक राजकारणात हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. प्रत्येक वार्डात इच्छुकांची रांग लागत असताना, वार्ड क्रमांक १२ मध्ये भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. या वार्डातून गेली अनेक वर्षे पक्षासाठी कार्यरत असलेले जगदीश बाबुराव सोनार यांनी आपल्या पत्नी स्वामिनी जगदीश सोनार यांना उमेदवारी देण्याची मागणी करत पक्षश्रेष्ठींना थेट आवाहन केले आहे.

जगदीश सोनार हे गेल्या २५ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाशी जोडलेले कार्यकर्ते आहेत. श्रीराम पेठ परिसरात राहत असून, त्यांनी सामाजिक, आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ते उपजिल्हा रुग्णालयात आरोग्यसेवक म्हणून कार्यरत असून, कोविड काळात नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी अहोरात्र झटून काम केले. त्या काळात रुग्णांना बेड मिळवून देणे, औषधोपचाराची सोय करणे, रक्तदान शिबिरे आणि गरजूंना मदत करणे या माध्यमातून त्यांनी आपली छाप पाडली.

वार्डातील पाणीटंचाईचा प्रश्न असो वा नागरिकांच्या आरोग्यविषयक अडचणी — प्रत्येक संकटसमयी धाव घेणारे कार्यकर्ते म्हणून जगदीश सोनार यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी टँकरद्वारे पाणी वाटप, सार्वजनिक मंडळांची स्थापना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यासारखे अनेक उपक्रम राबवून नागरिकांचा विश्वास जिंकला आहे.

सोनार यांनी सांगितले की, “मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून गेल्या २५ वर्षांपासून निष्ठेने काम केले. परंतु अनेक वेळा आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारीऐवजी केवळ काम करण्याची जबाबदारी दिली गेली. आता पक्षाने आमच्या त्यागाची परतफेड करावी, आणि माझ्या पत्नीस — स्वामिनी जगदीश सोनार — यांना वार्ड १२ मधून उमेदवारी द्यावी, अशी माझी नम्र अपेक्षा आहे.”

सोनार यांनी पुढे सांगितले की, “वार्ड १२ मधील नागरिकांनी मला नेहमीच विश्वास दिला. मी कोणाच्याही जाती-धर्माकडे न पाहता सर्वांसाठी काम केले. माझ्या पत्नीला संधी मिळाली तर आम्ही दोघे मिळून या वार्डाचा सर्वांगीण विकास करू.”

दरम्यान, वार्ड क्रमांक १२ हा जामनेर नगरपरिषदेतील राजकीयदृष्ट्या महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा वार्ड मानला जातो. येथे यापूर्वी अनेकदा पक्षातील प्रतिष्ठित नेत्यांनी वर्चस्व राखले आहे. मात्र या वेळेस निष्ठावंत कार्यकर्ते व नव्या चेहऱ्यांच्या उमेदवारीची मागणी जोर धरत आहे.

पक्षांतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, जगदीश सोनार हे स्थानिक संघटनात प्रभावी आणि जनसंपर्क असलेले कार्यकर्ते आहेत. त्यांनी पूर्वी पक्षाच्या हितासाठी विरोधी उमेदवारांना पराभूत करण्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या पत्नी स्वामिनी सोनार यांना उमेदवारी मिळाल्यास वार्डात भाजपची स्थिती अधिक मजबूत होऊ शकते, असे मत स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे की, वार्ड १२ मध्ये पुन्हा जुन्या प्रतिष्ठितांना उमेदवारी मिळते का, की पक्ष या वेळेस जमिनीवर काम करणाऱ्या निष्ठावंतांना संधी देतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भाजपसाठी ही निवडणूक स्थानिक पातळीवर निष्ठा विरुद्ध प्रतिष्ठा अशी ठरण्याची चिन्हे आहेत, आणि त्या लढाईत जगदीश सोनार यांचे नाव आता चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours