प्रदीप गायके आणि मनोज महाले यांच्यासह अनेकांचा भाजप प्रवेश
जामनेर, प्रतिनिधी
जामनेरच्या राजकारणात आज मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला.

भाजपमध्ये आज दोन महत्वाच्या एन्ट्रीज झाल्या. आतापर्यंत भाजपविरोधी भूमिकेत असणारे मनोज महाले, जीवन सपकाळ आणि प्रदीप गायके यांच्यासह काही ठराविक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करून सत्ताधारी भाजपचा हात मजबूत केला आहे. यामुळे विरोधकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, “भाजप विरोधात बोलणारेच आता पक्षात का?” असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उमटतोय. विधानसभा निवडणुकीत प्रदीप गायके आणि मनोज महाले या दोघांनी महाविकास आघाडीच्या बाजूने गिरीश महाजन यांच्या विरोधात काम केले होते. मात्र आता जामनेर नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या दोघांसह अनेक पदाधिकाऱ्यांच्या भाजपमध्ये आल्याने नक्की कोणत्या पक्षाला फायदा होणार की तोटा होणार हा प्रश्न आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, भाजपची सध्याची रणनीती ‘विरोधकांना सामावून घ्या’ अशी दिसत असून, पक्षनिष्ठा आणि विचारधारा या मूल्यांवर नवे प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. “विरोधकांना आपल्या गळाला लावून पक्ष विस्तार करण्याची नीती भाजपने स्वीकारली असली, तरी त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांच्या नाराजीची शक्यता नाकारता येत नाही,” असे मत स्थानिक राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.
सध्या जामनेरच्या राजकारणात या घडामोडींमुळे उत्सुकता वाढली असून, पुढील नगरपरिषद निवडणुकीत या बदलांचा नेमका परिणाम कोणाच्या बाजूने होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

+ There are no comments
Add yours