गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा
जामनेर : तालुक्यातील शेंदुर्णी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवसृष्टी व अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडले. या भव्य सोहळ्यास मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या ऐतिहासिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्थानिक मान्यवरांनी भूषवले. कार्यक्रमादरम्यान शिवप्रेमींच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. उपस्थित नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून स्वराज्याच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच शेंदुर्णी शहरात भव्य भीमसृष्टी आणि शिवसृष्टी उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या प्रसंगी शेंदुर्णीचे नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल, ज्येष्ठ नेते संजय गरुड, जिल्हाधिकारी रोहन घुगे,जे. के. चव्हाण, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, मंडळ अध्यक्ष कमलाकर पाटील, प्रदीप लोढा, दीपक तायडे यांच्यासह शिवप्रेमी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उभारलेला हा अश्वारूढ पुतळा केवळ स्मारक नसून पुढील पिढ्यांना स्वराज्य, शौर्य आणि स्वाभिमानाची प्रेरणा देणारे शक्तीस्थान ठरणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
+ There are no comments
Add yours