जामनेर : संकटकाळात मैत्रीचा हात पुढे! अंबिका गॅरेजसाठी मित्र परिवाराने उभी केली 64 हजारांची मदत

अंबिका गॅरेजला भीषण आग; 22 लाखांचे नुकसान — मित्रपरिवार मदतीसाठी धावला

मोहन दुबे,जामनेर, दि. 9 : शहरातील भुसावळ रोडवरील अंबिका गॅरेजला 4 डिसेंबर रोजी रात्री 9 ते 10 च्या दरम्यान लागलेल्या भीषण आगीत दहा वर्षांपासून उभा असलेला व्यवसाय क्षणात राख झाला. गॅरेजमधील सर्व साहित्य, उपकरणे आणि मालमत्ता जळून खाक झाली असून दुकानमालक भगवान रामदास निरखे यांना जवळपास 20 ते 22 लाखांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक निष्कर्षात स्पष्ट झाले असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे.

या आगीत गॅरेजमध्ये काम करणाऱ्या आठ युवकांच्या रोजगारावरही संकट ओढवले आहे. पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे 5 लाख रुपयांची गरज भासणार असल्याने निरखे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. मात्र, या कठीण प्रसंगी त्यांचा जुना मित्रपरिवार मोठा आधार ठरला आहे.

भगवान नीरखे यांच्या दुकानाला आग लागल्याचे समजताच इंदिराबाई ललवाणी शाळेच्या 2002 च्या दहावीच्या बॅचमधील तब्बल 170 विद्यार्थी तत्काळ एकत्र आले. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर संकटाची माहिती मिळताच सर्वांनी मनापासून मदत करण्याचा निर्णय घेतला. रुपेश पाटील, विशाल इंगळे, योगेश चौरे, गजानन मडवे यांनी पुढाकार घेत विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांना जोडले. काही तासांतच 64 हजार रुपयांची मदत जमा करून ती भगवान निरखे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

या बॅचमध्ये डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, हातमजूर अशा विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थी सामील असून संकटकाळात त्यांनी दाखवलेली एकजूट व मदतीची भावना कौतुकास्पद असल्याचे शहरात बोलले जात आहे. आपल्या मित्राला पुन्हा उभे करण्यासाठी सर्वांनी दाखवलेला पुढाकार ही मानवतेची जिवंत पावती असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

गॅरेजचे संपूर्ण नुकसान झाल्याने व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी अजूनही निधीची आवश्यकता असल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन सहकार्य करावे, अशी विनंती निरखे परिवाराकडून करण्यात आली आहे.भगवान निरखे यांनी “मित्रांच्या पाठबळामुळे पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा विश्वास मिळाला,” असे सांगितले. त्याचबरोबर एका हाकेवर मित्र परिवार आल्याने आणि आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत केल्याने सर्व मित्र परिवारांचे आभार व्यक्त केले.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours