भाजपच्या दोन गटांत तुफान राडा!; मंत्री गिरीश महाजन यांचा बंगला ठरला आखाडा

जामनेर : नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपमधील अंतर्गत वाद चिघळल्याचे चित्र समोर आले असून, थेट मंत्री गिरीश महाजन यांच्या बंगल्यावरच दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपचे दोन गट चर्चेसाठी जमले होते. मात्र चर्चा सुरू असतानाच दोन्ही गटांमध्ये आपसात वादाला तोंड फुटले.

मिळालेल्या माहितीनुसार, एका गटात भाजपचे विद्यमान नगरसेविकेचे पती सहभागी होते, तर दुसऱ्या गटात एक व्यक्ती होती. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र वाद अधिक चिघळत गेल्याने थेट हाणामारीपर्यंत प्रकरण पोहोचले. मंत्र्यांच्या बंगल्यावरच दोन व्यक्तींमध्ये हातघाई झाल्याने मोठी खळबळ उडाली.

मतदानासाठी पैसे घेऊन काम ने केल्याच्या आरोपावरून हा वाद उफाळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हाणामारीनंतर हे प्रकरण जामनेर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. मात्र या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी दिली आहे.

दरम्यान, जामनेर शहरात अलीकडच्या काळात किरकोळ वादांचे प्रमाण वाढले असून, अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवावी, अशी मागणी होत आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours