जामनेर : जामनेर तालुक्यातील शहापूर धरण परिसरात आज सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास डंपर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. वेगाने आलेल्या डंपरने मोटारसायकलवरून जाणाऱ्या तरुणाला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुण दुचाकीवरून मार्गस्थ असताना अचानक डंपरने त्याला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की तरुणाला बचावाची संधीच मिळाली नाही. अपघातानंतर डंपर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला.
मृत तरुण हा फत्तेपूर पिंपरी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून फरार डंपर चालकाचा शोध सुरू करण्यात आला आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, धरण परिसरात जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
+ There are no comments
Add yours