जामनेर :
जामनेर तालुक्यातील तलाठी कार्यालयात फेरफार नोंद व ७/१२ उताऱ्यावर नाव दाखल करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. वसीम राजु तडवी (वय २७, व्यवसाय नोकरी), तलाठी सजा–जामनेर (वर्ग-३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सरकारतर्फे घटक फिर्यादी म्हणून पोलीस निरीक्षक हेमंत खंडु नागरे (ला.प्र.वि., जळगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार हे जामनेर येथील रहिवासी असून त्यांनी १६ डिसेंबर २०२५ रोजी मौजे जामनेर येथील बिनशेतीचे दोन प्लॉट खरेदी केले होते. या प्लॉटची फेरफार नोंद करून तक्रारदार व त्यांच्या पत्नीचे नाव अधिकार अभिलेखात व ७/१२ उताऱ्यावर दाखल करण्यासाठी आरोपी तलाठी वसीम तडवी याने ५ हजार रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने ७ जानेवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. पंचासमक्ष आरोपीने लाचेची मागणी करत तडजोडीअंती ४ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर सापळा रचून आरोपीने ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहात अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस नाईक बाळु मराठे व पोलीस शिपाई भुषण पाटील सहभागी होते. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर करत आहेत.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही लोकसेवक लाच मागत असल्यास किंवा भ्रष्टाचाराबाबत माहिती असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र येथे संपर्क साधावा.
+ There are no comments
Add yours