आमदार सुरेश भोळे यांनी नगररचना विभागातील अधिकारी आणि भंगार चोरी प्रकरणी आरोपीला पाठीशी घालणाऱ्यांची चौकशीची केली मागणी!

महापालिकेतील अधिकारी दिगेश तायडेची सीआयडीमार्फत चौकशी करून नगररचना विभागातील भ्रष्टाचार बाहेर काढावा

आ. राजूमामा भोळे यांची हिवाळी अधिवेशनात महत्त्वाची मागणी

जळगाव : शहरातील महानगरपालिकेच्या पंधराव्या मजल्यावरील नगररचना विभागातील दिगेश तायडे नावाच्या अधिकाऱ्याची सीआयडीमार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे, नगररचना विभागातील भ्रष्टाचार बाहेर काढून सखोल तपासले पाहिजे, अशी मागणी शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान केली आहे.

महानगरपालिकेच्या नगररचना विभागामध्ये दिगेश तायडे नावाच्या अधिकाऱ्याविषयी जनतेत तीव्र नाराजी आहे. दिगेश तायडे याने त्याच्या पत्नीच्या नावे कोट्यवधी रुपयांचा फ्लॅट घेतला असल्याची माहिती हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार सुरेश तथा राजूमामा भोळे यांनी दिली. याबाबत आम्ही संबंधितांकडे तक्रार केली असून चौकशी करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.

नगररचना विभागात बसून अनेक लेआउट रिवाईस करून आपल्या पदाचा दुरुपयोग करीत दिगेश तायडे याने कोट्यवधी रुपयांची माया जमा केली असल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याची सीआयडीमार्फत निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी केली आहे. नगररचना विभागाविषयी जळगावच्या व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. या नगररचना विभागामध्ये आणखी काय काय भ्रष्टाचार झाला आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी आ. राजूमामा भोळे यांनी केली आहे.

भंगार, पाईप चोरी प्रकरणात मोकाट सूत्रधाराला पोलीस पाठीशी घालत असल्याचा आमदार सुरेश भोळे यांचा आरोप

जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या भंगार व पाईप चोरी प्रकरणांमध्ये मुख्य सूत्रधार अद्यापही फरार का ? तसेच त्याला कोण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे ? सूत्रधाराला पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी विधानसभेमध्ये केली आहे.

आ. राजूमामा भोळे यांची हिवाळी अधिवेशनात कठोर कारवाईची मागणी

आमदार राजूमामा भोळे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये याविषयी शासनाचे लक्ष वेधून घेतले. जळगाव शहरात पाईप चोरी प्रकरण गाजत आहे. या प्रकरणांमध्ये काही जणांना अटक झाली असली तरी मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. तसेच जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी सूत्रधारांना पाठीशी घालत गुन्हा नोंदवत असताना खाडाखोड केली आहे. अशा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी.

ब्रिटिशकालीन पाईपलाईन व भंगार चोरी प्रकरणात मुख्य सूत्रधाराला कोण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे ? अशा सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आ. राजूमामा भोळे यांनी केली.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours