जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; तिघांचा मृत्यू, २१ घरांचे नुकसान, पंचनामे सुरू

जळगाव दि. ११ जून
मंगळवारी सायंकाळी जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाने धुमाकूळ घातला. या नैसर्गिक आपत्तेमुळे तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक भागांत घरांचे, शेतीचे, वीजपुरवठ्याचे आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत कार्य आणि पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

या आपत्तीत एरंडोल तालुक्यातील नारायण सिताराम पाटील (वय ६८) यांच्यावर घर कोसळून, जळगाव शहरातील जगन रोहमाटे (वय ७५) यांच्यावर झाड कोसळून, तर जामनेर तालुक्यातील रीठीवाडी येथे रीहिणीबाई बारेला यांच्यावर पत्र्याचे शेड कोसळल्याने मृत्यू झाला. पाचोरा, यावल व जामनेर तालुक्यांमध्ये एकूण पाच जण जखमी झाले आहेत.

वादळामुळे पशुधनाच्या मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून, एकूण १७ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. यात एरंडोलमध्ये १२, जामनेरमध्ये २, भडगावमध्ये २ आणि पाचोऱ्यात १ जनावराचा समावेश आहे.

घरांच्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे: चाळीसगाव – ७, भडगाव – ५, मलकापूर – ५, रावेर – ४, अशी एकूण २१ घरे बाधित झाली आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी सातत्याने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने सर्व तालुक्यांत पंचनाम्यांचे आदेश दिले आहेत. दरम्यान, राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी रस्त्यांवरील पडलेली झाडे व विद्युत खांबे हटवून खंडित वीज पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे आदेश दिले.

जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी आज आपत्तीग्रस्त भागांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी संबंधित विभागांना पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे निर्देश दिले. रात्री उशिरापर्यंत त्यांनी शहरात फिरून परिस्थितीचा आढावा घेतला आणि जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातून तालुका स्तरीय यंत्रणेला आवश्यक त्या ठिकाणी मदतकार्य राबवण्याचे आदेश दिले.

निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष श्री. गजेंद्र पाटोळे यांनी रस्त्यावर उतरून मदत कार्यात सहभाग घेतला. त्यांनी रस्त्यावर पडलेली झाडे हटवून मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू केले.

हवामानाची स्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून मदत व पुनर्वसनाचे कार्य सुरू असून, सर्व संबंधित यंत्रणा सज्ज आहेत.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours