जामनेर : श्री प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेवर ५.०४ कोटींचा दंड
तहसीलदार कार्यालयाची अवैध गौण खनिज वापरावर मोठी कारवाई
जामनेर, दि. १ सप्टेंबर :
जामनेर तालुक्यातील पळासखेडा बु. येथील श्री प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेवर तब्बल ५ कोटी ४ लाख १८ हजार ५८० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तहसीलदार जामनेर व उपविभागीय अधिकारी, जळगाव यांच्या संयुक्त कारवाईतून हा आदेश दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी देण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष राजकुमार प्रकाशचंद काकडीया यांनी संबंधित गट क्रमांक ८२/१/१, ८२/१/२, ८६/२/१, ८६/२/२ वर अनधिकृत निवासी संकुल, फिजिओथेरपी इमारत, मुलींचे वसतिगृह तसेच जलतरण तलाव व चेंजिंग रूम उभारल्याचे निष्पन्न झाले. या बांधकामासाठी परवानगीशिवाय २१४६ ब्रास मुरुम व १०६२ ब्रास वाळू, असे एकूण ३२०८ ब्रास गौण खनिज वापरण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक पडताळणीतून स्पष्ट झाले.
नोटीस देऊनही संस्थेकडून योग्य खुलासा सादर न केल्याने महसूल विभागाने कारवाई करत दंडात्मक आदेश दिला. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८ (७) व ४८ (८) तसेच महाराष्ट्र गौण खनिज (विकास व विनियमन) नियम २०१३ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. दंडाची रक्कम आदेश प्राप्त झाल्यापासून ७ दिवसांच्या आत शासनाकडे जमा करण्याचे निर्देश दिले असून, अन्यथा रक्कम सक्तीने वसूल केली जाणार आहे.
या कठोर कारवाईमुळे अवैध बांधकामे व गौण खनिजांच्या गैरवापराला आळा बसणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे हा प्रकार उघड झाल्यावर त्या काळातील तत्कालीन ग्रामसेवक भास्कर पुंडलिक महाजन यांनी पोलिसांत औपचारिक तक्रार दिली आहे. त्यानुसार जामनेर पोलिस ठाण्यात IPC कलम 420 (फसवणूक), 463, 464, 465, 466, 468, 470, 471 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास जामनेर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या घटनेने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
+ There are no comments
Add yours