कामाच्या ठिकाणीच जीवन संपले! तरुण ऋषिकेशच्या आकस्मिक मृत्यूने मोहाडी गाव शोकसागरात 

 

सचिन तायडे प्रतिनिधी: मोहाडी (ता. जामनेर) — गावातील तरुण ऋषिकेश पंडित नेटके (वय १९ ते २० वर्षे) या मेहनती तरुणाचा कामाच्या ठिकाणीच झालेल्या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळला आहे. गारखेडा येथील सुप्रीम कंपनीमध्ये तो नाईट शिफ्टवर काम करत होता. मात्र, गुरुवार रात्री साधारण बारा वाजण्याच्या सुमारास त्याची प्रकृती अचानक बिघडली. सहकाऱ्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, पण हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याने प्राण सोडले. ऋषिकेश ला तात्काळ जळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच डॉक्टरने त्याला मयत घोषित केले. 

ऋषिकेश हा घरातील एकमेव कमावता सदस्य होता. वडील व आई हे दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करत असलेले, अत्यंत गरीब कुटुंब. मुलाच्या कमाईवरच घर चालत होते. त्याच्या अकस्मात जाण्याने घरच्यांवर दुःखाचा व आर्थिक संकटाचा डोंगर कोसळला आहे.

गावात सर्वत्र शोककळा पसरली असून, तरुण वयात अशा दुर्दैवी मृत्यूने सर्वांना चटका लावला आहे. स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी कंपनीकडून ऋषिकेशच्या कुटुंबाला योग्य आर्थिक मदत व भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

“घरचा आधार गेलेला, आणि भविष्य अंधारात गेले… ऋषिकेशच्या निधनाने मोहाडी गावाचे एक कर्तृत्ववान मूल हरपले,” अशा शब्दांत ग्रामस्थांनी अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours