जळगाव : आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांची भाजपच्या ‘निवडणूक प्रमुख’पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबत अधिकृत पत्र जारी करून ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या सलग यशामुळे आमदार राजूमामा भोळे यांची प्रभावी नेतृत्व क्षमता आणि संघटन कौशल्य अधोरेखित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीतही भाजपला घवघवीत यश मिळवून देण्याची धुरा त्यांच्या खांद्यावर देण्यात आल्याचे मानले जात आहे.
प्रदेशाध्यक्षांनी पत्रात नमूद केल्यानुसार, स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत जळगाव महानगरपालिकेची निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आ. भोळे यांच्या नेतृत्वावर पक्षाने पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.
सर्वांना सोबत घेऊन संघटन मजबूत करत अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी आता निवडणूक प्रमुख म्हणून आमदार राजूमामा भोळे यांच्यावर असणार आहे. या नियुक्तीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
+ There are no comments
Add yours