प्रफुल्ल लोढा यांचे भाजप, मविआच्या नेत्यांसोबत फोटो व्हायरल
राज्यात हनी ट्रॅप प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे. जामनेर तालुक्यातील प्रफुल लोढा यांच्यावर हनी ट्रॅप प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर अनेक दिग्गज राजकीय नेते मंडळी वादाच्या भौऱ्यात अडकले आहेत.
प्रफुल्ल लोढा यांची जवळीक नेमकी कुणाशी, यावरून सर्वत्र राजकीय ‘वार’ होत असून, भाजपकडून लोढाचे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतचे, तर आघाडीकडून लोढाने भाजप नेत्यांबरोबर काढलेले फोटो व्हायरल केले जात आहेत.
जामनेर तालुक्यातील प्रफुल्ल लोढावर पोक्सो, बलात्कार आणि हनीट्रॅपचा गुन्हा अंधेरी एमआयडीसी व साकीनाका पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. यापूर्वी प्रफुल्ल लोढावर साकीनाका पोलिस ठाण्यातही पोक्सोसह खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. साकीनाका पोलिसांकडून लोढा याला ५ जुलै रोजी चकाला येथून अटक करण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यातील जामनेर व पहूर येथील त्याचे घर व व्यापारी संकुलात झडती घेण्यात आली. तेथून इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे त्यात लॅपटॉप, पेनड्राइव्ह, कुटुंबीयांचे मोबाइल फोन पोलिस पथकाने जप्त केले. लोढा गिरीश महाजन यांचा समर्थक असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.
भाजपकडून जुने फोटो, व्हिडीओ व्हायरल
प्रफुल्ल लोढा यांचे अनेक दिग्गज नेते मंडळींसोबत चे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भाजपकडून प्रफुल्ल लोढा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतचे त्याचे फोटो व्हायरल केले जात आहेत. तसेच आमदार एकनाथ खडसे भाजपमधून काँग्रेसमध्ये आल्यानंतर लोढा यांनी पत्रकार परिषद घेऊन खडसेंवर केलेल्या गंभीर आरोपांचा व्हिडिओदेखील समाजमाध्यमांवर व्हायरल केला जात आहे.
‘हनी ट्रॅप प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा’
‘राज्यातील काही मंत्री व अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसने विधानसभेत केला, मुख्यमंत्र्यांनी असे काहीच घडले नाही, असे निवेदन राणा भीमदेवी थाटात केले. सवयीप्रमाणे मुख्यमंत्री धादांत खोटे बोलले. पण मुख्यमंत्र्यांच्या निकटच्या मंत्र्याबरोबर हनीट्रॅपशी संबंधित व्यक्तीचा फोटो झळकल्याने या प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे. सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे. या हनीट्रॅपची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी मुंबईत केली.
‘हनी ट्रॅप’ नाशिक, मुंबईला अन् पडसाद जळगावला
मुंबई व नाशिक जिल्ह्यात ‘हनी ट्रॅप’ झाल्याच्या दाव्यांमुळे पावसाळी अधिवेशन गाजले. प्रफुल्ल लोढा यांना मुंबईतील ‘हनी ट्रॅप’ च्या गुन्ह्यात अटक झाली. लोढा जळगाव जिल्ह्यातील असल्याने त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटत आहेत.
+ There are no comments
Add yours