नाशिकच्या पर्यावरण रक्षणासाठी दूरदृष्टीचा निर्णय; गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली ठोस पाऊल

नाशिक : ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या नाशिक शहराच्या विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचे मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी घेतलेला निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विकासकामांमुळे पर्यावरणावर येणारा ताण कमी करण्यासाठी केवळ औपचारिक वृक्षलागवडीऐवजी प्रत्यक्ष परिणाम देणारी, दीर्घकालीन आणि शास्त्रीय पद्धतीची वृक्षलागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

नामदार गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून नाशिकसाठी थेट २० ते २५ फूट उंचीची, पूर्ण वाढ झालेली आणि मजबूत मुळांची झाडे आणण्यात आली असून, ही संपूर्ण खेप नाशिक शहरात दाखल झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत तपोवन परिसरात साधू-संतांच्या हस्ते आणि नामदार महाजन यांच्या उपस्थितीत या झाडांची विधिवत लागवड होणार आहे. ही केवळ एक औपचारिक लागवड नसून, नाशिकच्या पर्यावरण रक्षणासाठीचे ऐतिहासिक पाऊल असल्याचे मानले जात आहे.

साधारणपणे वृक्षलागवड ही आकड्यांपुरती मर्यादित राहते. मात्र, मोठ्या उंचीची झाडे लावल्यामुळे सावली तात्काळ उपलब्ध होते, तापमान संतुलन राखण्यास मदत होते आणि कार्बन शोषण लगेच सुरू होते. त्यामुळे पर्यावरणीय लाभ दीर्घ प्रतीक्षेशिवाय मिळतो, हा या निर्णयाचा मोठा फायदा आहे.

विशेष म्हणजे, ही झाडे गुणवत्ता आणि टिकावासाठी ओळखल्या जाणाऱ्या अनुभवी नर्सरीतून आणण्यात आली आहेत. झाडांची सुरक्षित वाहतूक, शास्त्रीय लागवड आणि नंतर तग धरण्याची खात्री या सर्व बाबींचा विचार करूनच ही निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे महत्त्व अधिक वाढले आहे. लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने स्वच्छ हवा, सावली आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी हे पाऊल उपयुक्त ठरणार आहे. काही ठिकाणी या निर्णयावर टीका होत असली, तरी तो नाशिकच्या दीर्घकालीन हितासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी अत्यावश्यक असल्याचे  मत अरविंद देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधण्याचे उदाहरण नामदार गिरीश महाजन यांनी या निर्णयातून घालून दिले असून, नाशिकच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही भक्कम पायाभरणी ठरणार असल्याचे राजकीय व सामाजिक वर्तुळातून बोलले जात आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours